Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

मागच्या आठवड्यात आपण बघितले की २६AS चे महत्व काय आहे, तसेच २६AS वर कपात केलेला टी. डी. एस. दिसण्यासाठी काय करावे लागते. आज आपण २६AS वर चुकीची माहिती दिसत असेल तर काय करावे किंवा दिसतच नसेल तर काय करावे हे बघू.

प्रश्न – उमेशरावांनी रामरावांना एकूण ९ लाख रु. आज दिले. रामरावांच्या २६AS वर ५०,००० टी. डी. एस. दिसत आहे. रामरावांनी काय करावे? 
- रामराव यांना ९ लाख आज मिळाले म्हणजे त्यांच्या २६AS वर १०% प्रमाणे ९०,००० दिसायला पाहिजे. जर ते ५०,००० दिसत असेल तर त्यांनी उमेशरवांना त्यांचे टी. डी. एस. चे रिटर्न रिवाईज करायला सांगावे. तसेच त्यांच्या कडून ९०,००० चे टी. डी. एस. कपातीचे प्रमाणपत्र घ्यावे जेणे करून त्यांना भविष्यात आयकर विभागाकडून अडचण येणार नाही. 

प्रश्न – वरील उदाहरणात जर रामरावांच्या २६AS वर ११०,००० टी. डी. एस. दिसत असेल तर काय करावे? 
- जर रामरावांच्या २६AS वर ९०,००० ऐवजी ११०,००० टी. डी. एस. दिसत असेल तरी रामरावांनी फक्त ९०,००० चे रिटर्न मध्ये क्लेम करावे. जर त्यांनी ११०,००० क्लेम केले तर याला दोन शक्यता आहे.

एक – जर टी. डी. एस. ११०,००० क्लेम केला तर त्यांचे उत्पन्न सुद्धा ११०,००० गृहीत धरवे लागेल. कारण ११ लाखांचे १०% हे ११०,००० होतात. या जास्तीच्या टी. डी. एस. च्या लालसे पोटी त्यांना या दोन लाखांवर अधिक टॅक्स भरावा लागेल (टॅक्स स्लॅब मुळे जे आपण आधीच्या लेखात पहिले आहे.)

दोन – रामरावांनी ११०,००० टी. डी. एस. क्लेम केला व रिटर्न दाखल केले. थोड्या दिवसांनी उमेशरावांना त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी रिवाईज रिटर्नद्वारे ती चूक दुरुस्त केली. आता रामरावांनी रिटर्न मध्ये ११०,००० क्लेम केले व २६AS वर ९०,००० दिसत आहे. रामरावांना अशा परिस्थितीत आयकर विभागाकडून नक्की अडचण येणार.

प्रश्न – प्रकाशरावांना २६AS वर काहीच दिसत नाही. सागररावांकडून त्यांना ५००,००० कमिशन मिळाला आहे?
- त्यांना कमिशन देणाऱ्या सागररावांना त्यांचे टी. डी. एस.रिटर्न दाखल करण्यास सांगावे तसेच त्यांच्या कडून १६ नंबर फॉर्म मागवून घेण्यात यावा.

प्रश्न – रामरावांच्या २६AS वर ९००० टी. डी. एस. दिसत आहे जे त्यांना कमिशन वर मिळाले आहे. पूर्ण आर्थिक वर्षात त्यांचे या व्यातिरिक्त काहीच उत्पन्न नाही. त्यांना रिटर्न भरण्याची गरज आहे का? (समजण्यासाठी कमिशनवर १०% टी. डी. एस. घेऊ)
-रामरावांचे एकून उत्पन्न हे ९०,००० असावे कारण ९०,००० वर १०% हे ९००० होतात. नियमाप्रमाणे त्यांना रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही. परंतु हे आयकर विभागाला कसे समजावे की रामरावांचे या व्यातिरिक्त दुसरे उत्पन्न नाही? म्हणून त्यांना नोटीस येऊ शकते कारण त्यांच्या २६AS वर माहिती आहे. म्हणून रामरावांनी स्वतः हून रिटर्न दाखल केलेले कधीही उत्तम हे रिटर्न त्यांना रिफंड घेण्यासाठीही कामी येईल.