गेल्या अनेक आठवड्यापासुन आपण 'पॅन' म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर बद्दल बघत आहोत. आता पर्यन्त आपण पॅन बद्दल अनेक महत्वाच्या बाबी बघीतल्या. त्यात प्रामुख्याने रीवीजन म्हणून बघुया की पॅन म्हणजे काय येथुन सुरुवात करून पॅन घेणे कोणास आवश्यक आहे, पॅन घेण्यास कोणत्या व्यक्तीस कोणते कागदपत्रे द्यावी लागतात, प्रुफ ऑफ अॅड्रेस म्हणजे काय? फार्म 49 ए म्हणजे काय? व्यक्ती, हिंदु अविभक्त कुटूंब, पार्टनरशीप फर्म व ए. ओ. पी. यांना काय कागदपत्रे दयावी लागतात, application द्वारे पॅन कसे घेता येइल, इन्कमटॅक्स ऑफीसर पॅन घेण्यास कधी सक्ती करू शकतो? पॅनचे स्पेशल फीचर काय आहे? नवीन पॅन कार्ड कसे मिळु शकते? पॅन कार्ड नंबर कोण कोणत्या व्यवहारात देणे आवश्यक आहे? अशा अनेक महत्वाच्या बाबी बघीतल्या. आज आपण मायनॉर म्हणजे नाबालीक/ अवयस्क व्यक्तीसाठीचा कायदा व इतर महत्वाच्या बाबी बद्दल सविस्तर सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत जे व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावे.
प्रश्न - अवयस्क व्यक्तीचे स्वतःचे व्यवहार नसले तर पॅन नंबर कोणाचे दयावे लागणार ?
- व्यवहारात आपण बघतो की अनेक वेळी अवयस्क व्यक्तीच्या नावे व्यवहार केले जातात त्याची विविध कारणे असु शकतात. अशा वेळेस आई किंवा वडील यांच्या नावाचे पॅन नंबर व्यवहारात दिले जाईल व अवयस्क व्यक्तीचे उत्पन्न आई किंवा वडीलाच्या उत्पन्नात जोडले जाइल. याची सविस्तर माहिती इन्कमटॅक्स कायद्याच्या नियम 114 बी मध्ये दिलेली आहे.
प्रश्न – जर एखा़द्या व्यक्तीकडे अजुनही पॅन नसेल परन्तु व्यवहार करायचे आवश्यक असल्यास त्यास अजुन काय मार्ग आहे?
- जर एखाद्या व्यक्तीकडे पॅन नसेल परन्तु आर्थिक व्यवहार केला गेला असेल तर त्यास दोन पर्याय असू शकतात. एक तर त्याने पॅनचे नवीन अर्ज करून त्याचा application form ची प्रत त्या व्यवहारास टेम्पररी प्रुफ म्हणून जोडावी किंवा दुसरा पर्याय म्हणजे फार्म नं. 60 भरून दयावे व त्या फार्म मध्ये आपल्या आर्थिक व्यवहारा बद्दल सविस्तर माहिती दयावी. फार्म नं. 60 हे डीक्लेरेशन फार्म आहे, ज्यात आपल्याला सविस्तर माहिती देणे गरजेचे असते.
प्रश्न - कोणाला पॅन नंबर देणे आवश्यक नाही ?
- पॅन नंबर देण्यासाठी काही करदात्यांना माफी देण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांचा समावेश आहे. याच प्रकारे जर केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने काही विशिष्ट व्यक्तीस माफी दिली किंवा द्यायची ठरवली असेल तर त्यांना ही पॅन नंबर कोणत्याही व्यवहारास देण्याची आवश्यकता राहत नाही.
पॅनची अधीक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.